सिंधी कॉलनी, कारंजा (लाड) येथील रहिवासी स्व. वासुदेव नारायणदास बसंतवाणी (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवार, १९ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. दुःखाच्या या क्षणीही बसंतवाणी कुटुंबाने मोठ्या धैर्याने समाजासाठी एक प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांच्या मुलांनी, हरीश बसंतवाणी व चंद्रेश बसंतवाणी यांच्या पुढाकाराने, स्वर्गीय वासुदेव यांच्या नेत्रदानाचा संकल्प केला. "दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी" या उदात्त हेतूने त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली..

अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या राष्ट्रीय नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ता डॉ. विजय जवाहरमलाणी आणि विजय जेसवाणी यांच्याशी तातडीने संपर्क साधण्यात आला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू बंड व श्री अनिल देशमुख यांनी तत्परतेने कारंजा येथे येऊन रात्री १ वाजता नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या वेळी दिशा ग्रुप कारंजाचे सदस्य मुकेश थदाणी, कृष्णा राघवाणी, चिराग राघवाणी, इश्वर बसंतवाणी, हरीश पंजवाणी, दीपक बसंतवाणी, संजय बसंतवाणी, संतोष नागवाणी आणि इतर परिवारातील सदस्य उपस्थित होते. कुटुंबीयांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या संचालक मंडळाने त्यांचे आभार मानले आणि स्व. वासुदेव बसंतवाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नेत्रदानाचे महत्त्व: भारतासमोर अंधत्व ही एक गंभीर समस्या आहे, परंतु नेत्रदानाच्या माध्यमातून आपण अनेक अंधांना दृष्टी देऊ शकतो. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना जीवनाचा प्रकाश दिसू शकतो.
नेत्रदान कोण करू शकतो?
उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेल्या किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्यांचेही नेत्रदान होऊ शकते.
नेत्रदानासाठी योग्य वेळ: मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
नेत्रदान प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे:
मृत व्यक्तीचे डोळे बंद करा आणि त्यावर ओल्या कापसाचे बोळे ठेवा.
डोक्याखाली दोन उशा ठेवा.
पंखा बंद ठेवा आणि ए.सी. असल्यास तो सुरू ठेवा.
त्वरित दिशा इंटरनॅशनल आय बँकेशी संपर्क साधा.
नेत्रदानामुळे केवळ एका व्यक्तीला दृष्टी मिळत नाही, तर त्या कुटुंबाला आनंद आणि आशा मिळते. आपणही या पवित्र कार्यात सहभागी होऊन समाजाला प्रकाशमय करण्याचा संकल्प करूया. अधिक माहितीसाठी दिशा इंटरनॅशनल आय बँकेशी 989-989-8667 / 8275539754 संपर्क साधा किंवा www.deeshagroup.org या संकेत स्थळावर भेट द्यावी.
नेत्रदान हा फक्त एक कृती नसून मानवतेच्या सेवेसाठी दिलेला सर्वोत्तम संदेश आहे. स्व. वासुदेव बसंतवाणी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना त्यांच्या उदात्त कृत्याने आपल्यालाही प्रेरणा मिळावी.
“नेत्रदान, जीवनदान – एक कृती, अनेक आयुष्यांना प्रकाश!”